सांगोला – सांगोला शहरातील डिजिटल बॅनर व फ्लेक्स लावण्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष आनंदा माने यांचे अध्यक्षतेखाली सर्व डिजिटल बॅनर प्रिंटिंग व्यावसायिकांची बैठक सांगोला नगरपरिषद येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सांगोला शहरात डिजिटल बॅनर व फ्लेक्स लावण्यापूर्वी नगरपरिषदेकडून आवश्यक परवानगी घेण्यात येऊन जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी सूचना केल्या. सार्वजनिक ठिकाणी, चौकामध्ये, रस्त्यांच्या कडेला तसेच शासकीय मालमत्तेवर नगरपरिषदेची परवानगी न घेता अनधिकृत बॅनर, फ्लेक्स लावू नयेत असे आनंदा माने यांनी सांगितले. नगरपरिषदेने सांगोला शहरात परवानगी घेऊन डिजिटल बॅनर लावण्यासाठी एकूण ११ ठिकाणे निश्चित केलेली आहेत. शहरातील डिजीटल व्यवसायकांनी नगरपरिषदेकडून व्यवसाय ना-हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. तसेच डिजिटल बोर्ड प्रिंट करतेवेळी त्यावर नगरपरिषदेकडून देण्यात येणारा क्युआर कोड प्रिंट करणे बंधनकारक आहे. डिजिटल बॅनर साईज १०x१०, १०x१५ व १०x२० फूट या प्रमाणात ठेवण्यात यावेत, अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सदर बैठकीसाठी प्रशासकीय अधिकारी सचिन पाडे, प्र.स्वच्छता निरीक्षक महेश रजपूत आणि सर्व डिजिटल बॅनर प्रिंटिंग व्यावसायिक उपस्थित होते.
Post Views: 6