सोलापूर – लोकशाहीचे रक्षण, मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेसने रस्त्यावर उतरत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘मत वाचवा–देश वाचवा’ अभियानांतर्गत शुक्रवारी काढण्यात आलेल्या रॅलीत खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी अपुरी मदत आणि सोलापूरच्या अनियमित पाणीपुरवठ्यावरून सरकारला धारेवर धरले.
( टीप मेल वरील फोटो लावणे विनंती )
शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत चार हुतात्मा पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी रॅली काढण्यात आली. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदार याद्यांमधील कथित फेरफारांवरून भाजपवर टीका केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतचोरीविरोधातील लढा अधिक तीव्र केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांची पारदर्शक चौकशी व्हावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम राहावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीलाताई आबुटे, बाबा मिस्त्री, प्रा. नरसिंह आसादे, प्रा. अशोक निंबर्गी, राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, जुबेरभाई कुरेशी, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, सागर उबाळे, तिरुपती परकीपंडला, नागनाथ कदम, युवराज जाधव, रुपेश गायकवाड, विवेक खन्ना, वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, सुभाष वाघमारे, ॲड. करीमुन्निसा बागवान, प्रा. भोजराज पवार, हरुण शेख, रमेश कैरमकोंडा, उदयशंकर चाकोते, देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, शिवशंकर आंजनाळकर, परशुराम सतारेवाले, भरत जाधव आदींची उपस्थिती होती.
चौकट
पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा!
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि चारा-पाणीटंचाईने शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याचे शिंदे म्हणाल्या. पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
चौकट
धमक्या नकोत, सोलापूरकरांना नियमित पाणी द्या!
सोलापूर शहरात सहा ते सात दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. निवडणुकीपूर्वी नियमित पाणीपुरवठ्याची आश्वासने देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता त्यांची अंमलबजावणी करावी. पाण्याच्या वापरावरून नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्याऐवजी नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, असे शिंदे यांनी सुनावले. पाणीपुरवठ्याच्या कामांत पारदर्शकता ठेवून कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.