सोलापूर – मोठ्या भावाच्या भांडणामध्ये पडल्याने झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या १८ वर्षीय लहान भावाचा उपचारादरम्यान सोलापुरात आज बुधवारी दुपारी मृत्यू झाला.
सुजित सुभाष राठोड (वय १८ वर्ष, रा. लमाण तांडा, बालाजी नगर मंगळवेढा) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे.
यातील मयत सुजित राठोड याचा भाऊ रणजित हा दिव्यांग आहे. सोमवारी सायंकाळी बालाजी नगर येथील गणपती पवार यांच्या हॉटेल समोर शशिकांत शिवाजी पवार हा रणजित याची चेष्टा करीत होता. यातूनच शशिकांत याने रणजित याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही माहिती समजताच सुजित हा तेथे आला. भावाला का मारताय असा जाब विचारत असताना शशिकांत पवार, आशिष शिवाजी पवार, सागर राम राठोड यांनी सुजित याला लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. सुजित याच्या डोक्यात मार बसल्याने तो जागीच बेशुध्द झाला. त्याला उपचारासाठी मंगळवेढ्यातील खाजगी दवाखान्यातून सोलापुरातील सी एन एस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजता येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
चौकट – युवकाच्या मृत्यूनंतर तिघा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल – एकास अटक
सुजित राठोड याच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी २१ एप्रिल रोजी रात्री मंगळवेढा पोलीस ठाण्यात शशिकांत बालाजी पवार, आशिष शिवाजी पवार आणि सागर राम राठोड (सर्व रा. बालाजीनगर लमाणतांडा ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .दरम्यान आज बुधवारी दुपारी सुजित राठोड याचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्याच्या कलमांमध्ये वाढ करून वरील तिघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर आरोपी सागर राठोड यास आज अटक करण्यात आली असून त्याला उद्या गुरुवारी मंगळवेढा येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार नागेश बनकर हे करीत आहेत .

























