धाराशिव – विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.22) सायंकाळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती आणि हभप, भन्तेजी, मौलानांसह अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांच्या सहभागाने मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढला.
गेल्या 25 वर्षांपासून अठरापगड जाती-समूहांना एकत्रित करत बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे यांनी जयंती उत्सव समिती अध्यक्षपदाचा बहुमान सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना दिला आहे. शहरातील क्रांती चौक भीमनगर येथे जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, जयंती समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, समितीचे अध्यक्ष तथा सांजा गावचे सरपंच प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, विशाल शिंगाडे, जातमुक्त गाव करणारे सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे पाटील, मसूद शेख अॅड.परवेज काझी, पंकज काटे, बार्शीचे उद्योजक सुनील भराडीया, मौलाना अय्युब कासमी, मौलाना मुफ्ती रहेमतुल्ला, मौलाना जाफर खानसाब, मौलाना सजीयोद्दीन शेख, मौलाना कारी कलीमसाब, भन्ते सुमेधजी नागसेन, भन्ते कमल धम्मो, भन्ते संघदूत, भन्ते विनीत धम्म, भन्ते सुमित बोधी, हभप प्रकाश बोधले महाराज, हभप धनंजय महाराज सांजेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.
कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांचा शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान उपस्थित मौलाना, भन्तेजी, हभप यांच्या हस्ते करण्यात आला. तर सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे पाटील, अधीक्षक अभियंता संजय आडे यांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला.
प्रास्ताविकात समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी उत्सव सोहळ्याची पार्श्वभूमी विशद करून संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणार्या सामाजिक कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी दलीत बहुजन समाजाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मसूद शेख, समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
आशीर्वचन मार्गदर्शन हभप प्रकाश महाराज बोधले, मौलाना जाफर महंमदअली खान, भन्ते सुमेधजी नागसेन यांनी केले. जातमुक्क्त गाव संकल्पनेचे प्रेरणास्थान शरद आरगडे पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
अन्यायाची जाणीव झाली तर अन्याय दूर होईल – मनोज जरांगे पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माचा आदर केला. त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन मी समाजासाठी मैदानात उतरलो आहे
समाजातील सर्व घटकांमी आपल्यावरील अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला तर अन्याय दूर होईल. आपल्यावर झालेल्या अन्यायाला दूर करायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्याची जाणीव आपण करून घ्यावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी तर आभारप्रदर्शन समितीचे कार्याध्यक्ष सुधीर पवार यांनी केले.
क्रांती चौक भीम नगर येथून शिस्तबद्धपणे, पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापुरुषांना अभिवादन करून परत क्रांती चौक येथे विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीने सर्व धाराशिवकरांचे लक्ष वेधले. मिरवणुकीसाठी बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
धाराशिव शहरात संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच त्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

























