पंढरपूर – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानयात्री डॉ. बी.पी. रोंगे यांनी सोमवारी (दि. ५ आक्टोबर) पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. पंढरपुरसह पुणे मार्गावरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले तसेच त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्याकडे प्रस्थान करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे सचिव डॉ. सूरज रोंगे, संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी व रोंगे कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधत असून त्यांच्या समस्या समजून घेत आहे. शिक्षकांच्या नोंदणी प्रक्रियेतही आम्ही सक्रिय सहभाग घेतला. या कामाला पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षकांमधूनच उमेदवारीसाठी आग्रह झाल्याने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या उमेदवारीमागे शिक्षकांमधून झालेला उठाव आहे. ४० वर्षांचा संघर्षमय अनुभव, शिक्षक व प्राध्यापक म्हणून कामाचा अनुभव आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहण्याची भूमिका यामुळे शिक्षकांनी नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,असे डॉ. रोंगे यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी जाहीर न झाल्यानंतरही शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. चंदगडपासून करमाळ्यापर्यंत तसेच मैंदर्गी-दुधनीपासून मुळशीपर्यंत शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
चौकट –
जुनी पेन्शन आणि अशैक्षणिक कामांचा मुद्दा प्राधान्याने: डॉ.बी. पी. रोंगे निवडून आल्यास जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित असलेल्या सुमारे २६ हजार शिक्षकांना न्याय मिळवून देणे ही आपली पहिली प्राथमिकता असेल, असे डॉ. रोंगे यांनी सांगितले तसेच शिक्षकांवर असलेल्या अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार कमी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना अधिक वेळ मिळावा, यासाठी विधिमंडळात ठोस भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेतनश्रेणी निश्चिती आणि अनुदानाच्या टप्प्यांच्या प्रश्नातून शिक्षकांची सुटका करण्यासाठीही अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नुसते लढायचे नाही, तर लढायचे आणि जिंकायचेच आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आशीर्वादाने विजयाची माळ आपल्या गळ्यात पडेल, असा विश्वास डॉ. रोंगे यांनी व्यक्त केला.
Post Views: 8