तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज, बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजयवाडाच्या केसरपल्ली येथील गन्नावरम विमानतळासमोरील मेधा आयटी पार्कजवळ हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी, रामदास आठवले, अनुप्रिया पटेल, चिराग पासवान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही हजेरी लावली. यावेळी पीठापुरम विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले पवन कल्याण यांना चंद्राबाबू मंत्रिमंडळाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. पवन कल्याण यांनी त्यांचा मोठा भाऊ चिरंजीवी यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरू केला. चिरंजीवी यांनी 2008 मध्ये प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली. तथापि, त्यांच्या भावाने प्रजा राज्यम पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. पवन कल्याण यांनी 2014 मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. आता त्यांचा पक्ष टीडीपी आणि भाजपासह सत्तेत आलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त, टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनीही आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
या सोहळ्याला सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता चिरंजीवी देखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी तिरुमला येथे जातील आणि तेथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्श घेणार आहेत. याबाबत मंदिर व्यवस्थापनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यानंतर नायडू आज संध्याकाळी आपल्या कुटुंबीयांसह तिरुमला येथे पोहोचतील. रात्रीच्या विश्रांतीनंतर ते सकाळी भू-वराह स्वामी मंदिरात जातील आणि नंतर भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना करतील. येथून ते रेनिगुंटा विमानतळावरून विजयवाड्याला रवाना होतील.
नायडू यांची मंगळवारी एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. ते 1995 मध्ये प्रथम मुख्यमंत्री झाले आणि 2004 पर्यंत सलग 9 वर्षे अविभाजित आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले. त्यानंतर 2014 मध्ये नव्याने विभाजित झालेल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून ते पुन्हा सत्तेवर आले आणि 2019 पर्यंत या पदावर राहिले. आंध्र प्रदेश विधानसभेत एकूण 175 आमदार आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 26 मंत्री असू शकतात. आंध्र प्रदेशातील एनडीएमध्ये टीडीपी, भाजप आणि जनसेना यांचा समावेश आहे. या निवडणुकीत एनडीएने 164 जागा जिंकल्या आहेत.