बार्शी – तालुक्यातील कांदलगाव येथील तीर्थक्षेत्र श्री नृसिंह मंदिरात नृसिंह जयंती (प्रकट दिन) निमित्त पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह, गीतरामायण व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला आज सकाळी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सप्ताहाच्या निमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, भजन, हरिपाठ व नामस्मरण, तसेच संध्याकाळी प्रवचन आणि रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात शुक्रवार दि.२४ ह.भ.प. गुरुवर्य गोपाल अण्णा वासकर महाराज (पंढरपूर), शनिवार २५ रोजी ह.भ.प. राजेंद्रजी महाराज सावंत (किहीपाई, ता. जि. बीड), रविवार दि.२६ रोजी ह.भ.प. भागवताचार्य ज्ञानेश्वरी ताई सोळंखे (परतूर), सोमवार २७ रोजी ह.भ.प. गुरुवर्य अण्णासाहेब बोधले महाराज (डिकसळ),मंगळवार दि.२८ रोजी ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज (बार्शी),बुधवार २९ रोजी ह.भ.प. माऊली महाराज पठाडे (कर्जत) व गुरुवार ३० रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर (माऊली) नगरे महाराज यांच्या कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
दररोज दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत रामयनाचार्य संतोष मुंडे महाराज यांचे गीत रामायण होणार आहे.
नामसंकीर्तनाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय झाला असून, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. गीतरामायण व ज्ञानेश्वरी पारायणातून रामकथा व संत साहित्याचे चिंतन घडत आहे.
सप्ताहादरम्यान हरिजागर, भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नृसिंह जयंतीच्या दिवशी दुपारी उत्सव मूर्तीची मिरवणूक, आणि सूर्यास्त वेळी प्रकट दिन सोहळा(गुलालाचा कार्यक्रम) पार पडणार आहे.शुक्रवार 1 मे रोजी सीताराम गड खर्डा चे महंत महालिंग महाराज यांचे कल्याचे कीर्तन नंतर महाप्रसाद होईल. सायंकाळी शेरणी वाटप, रात्री पालखी सोहळा होईल. तर शनिवारी देवाला निरोप दिल्यानंतर सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष हरिदास फुरडे-पाटील आणि सरपंच प्रदीप नवले यांनी दिली.
नृसिंह प्रकट दिनानिमित्त गावातील जवळपास 50 टक्के महिलांना नऊ दिवसाचा उपवास असतो. तर प्रकट दिनी अख्ख्या गावाला उपवास असतो.


























