सोलापूर : शहरातील नागरी सेवा अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खाजगी मिळकतधारकांना त्यांच्या बाधित क्षेत्राच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) प्रमाणपत्रांचे वितरण आता बीपीएमएस (Building Permission Management System) पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे.
शहराच्या विकास आराखड्यानुसार (डीपी) विविध रस्त्यांसाठी बाधित होणाऱ्या खाजगी मिळकतधारकांना महाराष्ट्र शासनाच्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) अंतर्गत टीडीआर देण्यात येतो. यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती.मात्र, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी टीडीआर मंजुरी व प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, सोलापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बीपीएमएस पोर्टलद्वारे टीडीआर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत मिळकतधारक मल्लिकार्जून शिवशरण शेगावकर आणि विश्वनाथ शेगावकर यांना गुरुवारी आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या हस्ते ऑनलाईन टीडीआर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
मौजे मजरेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ९/९, ९/७+८ मधील जागा विकास आराखड्यातील ९ मीटर, १२ मीटर, १८ मीटर आणि ३० मीटर रुंदीच्या डीपी रस्त्यांसाठी बाधित होत आहे. या बाधित क्षेत्राच्या मोबदल्यात संबंधित मिळकतधारकांना नियमानुसार हस्तांतरणीय विकास हक्क प्रदान करण्यात आला आहे. हे पहिले ऑनलाईन टीडीआर प्रकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी उपसंचालक झगडे, सहायक संचालक शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कनिष्ठ अभियंता सलमान मनियार आणि रोहित हारके यांनी तांत्रिक व प्रशासकीय स्तरावरील कार्यवाही पूर्ण केली.
मिळकतधारकांच्या कार्यालयीन फेऱ्या कमी होतील
यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, महापालिकेच्या सेवा अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. टीडीआर प्रक्रियेचे ऑनलाईनकरण हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे मिळकतधारकांच्या कार्यालयीन फेऱ्या कमी होतील, प्रक्रियेला गती मिळेल आणि संपूर्ण कार्यवाही अधिक पारदर्शक होईल. भविष्यातही महापालिकेच्या विविध सेवांचे डिजिटायझेशन करून नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
Post Views: 23