पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात काल मोठा रेल्वे अपघात झाला. सियालदहला जाणाऱ्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीनं धडक दिली. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जण जखमी झाले. मृतांमध्ये मालगाडीच्या लोको पायलटसह प्रवासी ट्रेनच्या गार्डचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी जलपायगुडी रेल्वे स्थानकापासून ३० किलोमीटर दूर हा अपघात झाला.
मालगाडीच्या इंजिनानं धडक देताच कंचनजंगा एक्स्प्रेसचे मागील ४ डबे रुळांवरुन उतरले. मालगाडीच्या लोको पायलटनं सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यानं अपघात झाल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा यांनी दिली. गुवाहाटी-दिल्ली मार्गावर कवच यंत्रणा सुरु नसल्यानं हा अपघात झाल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघाताच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
अपघात स्थळापासून जवळ असलेल्या गावात सोमवारी ईद साजरी करण्यात आली नाही. ग्रामस्थांनी मदतकार्यात स्वत:ला झोकून दिलं. तरुणांनी जखमींना डब्यांमधून बाहेर काढलं. त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. स्थानिकांनी अपघातास्थळावरील परिस्थितीची माहिती माध्यमांना दिली. ‘अपघाताबद्दल कळताच गावकरी मदतीसाठी धावले. अपघातस्थळावरील परिस्थिती मन विषण्ण करणारी होती. कोणाचा हात कापलेला होता, तर कोणाचा पाय कापला गेला होता. कोणाच्या डोक्याला जखम झालेली होती. आम्ही जखमींना बाहेर काढलं आणि रुग्णालयात पाठवलं,’ अशी माहिती स्थानिकांनी दिली.
‘सकाळी खूप मोठा आवाज झाला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा दोन ट्रेन्सची धडक झालेली दिसली. एक्स्प्रेस ट्रेनला सिग्नल मिळू शकला नव्हता. त्यामुळे ती थांबली होती. मालगाडीनं तिला मागून धडक दिली होती. जखमींचा जीव वाचवण्यासाठी ३० ते ४० जणांनी मदतकार्य सुरु केलं,’ असं स्थानिकानं सांगितलं. जखमी झालेले प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते, अशी आँखोदेखी २१ वर्षीय एम. डी. हसन यांनी कथन केली. ‘आम्ही पोहोचलो तेव्हा अनेकजण डब्यांमध्ये अडकले होते. आम्ही त्यांना बाहेर काढून वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. आम्ही आमच्या वाहनांनी १२ ते १५ जणांना रुग्णालयात नेलं,’ असं हसन यांनी सांगितलं.