जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका येथे सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शहरस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुलांच्या स्केटिंग स्पर्धेत एस.पी.एम. इंग्लिश स्कूलचा होतकरू व गुणवान खेळाडू कु.असित कांबळे याने आपल्या वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळाचे अप्रतिम दर्शन घडवत स्केटिंग क्वाड या प्रकारात शहरस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले.
असितने आपल्या उत्कृष्ट स्केटिंग कौशल्याने उपस्थितांची मने जिंकत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची पुणे विभागीय शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही निवड एस.पी.एम. इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठरली आहे.
असितच्या या उज्ज्वल यशाबद्दल एस पी एम शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल बर्वे व शाळा समिती सदस्य श्री.सुरेशबाबु मंकणी तसेच प्राचार्या सौ.संगीता कोळी व श्री.प्रकाश कंपली यांनी त्याचे अभिनंदन करुन पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. असितला प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.श्रेयस सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
*खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था!*
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे ही केवळ शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणारी संस्था नसून,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेली संस्था आहे. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच मैदानावरील कौशल्यालाही तितकेच महत्त्व देत, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना वाव मिळावा, त्यांच्या स्वप्नांना भरारी घेता यावी आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी संस्था सातत्याने खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.
असित कांबळेच्या या यशातून जिद्द, मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि संस्थेचे सहकार्य दिसून येतो. त्याच्या या यशस्वी वाटचालीबद्दल एस.पी.एम. इंग्लिश स्कूल परिवारातून कौतुकाचा वर्षाव होत असून, पुणे विभागीय स्पर्धेतही असितने आपल्या कौशल्याची चमक दाखवत प्रशालेचे व संस्थेचे नाव अधिक उंचीवर न्यावे, यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
Post Views: 105