सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध कामांची तब्बल २८ कोटी रुपयांची बिले नऊ महिन्यांपासून प्रलंबित होती. दरम्यान, मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी तातडीने कार्यवाही करून १० कोटी रुपयांची बिले संबंधित मक्तेदारांना अदा केली आहेत. महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांचे आभार मानले.
देयकांची वर्गवारी बदलून छोट्या ठेकेदारांवर अन्याय केला जात असल्याचे आरोप करत बिले तातडीने अदा न केल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा
महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्य लेखापाल कार्यालयाने तातडीने दखल घेत सुमारे १० कोटी रुपयांची बिले संबंधित मक्तेदारांना अदा केली आहेत.
महापालिका प्रशासनाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार देयकांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली आहे. मुख्य कार्यालयासह झोन क्रमांक १ ते ८ मधील मेंटेनन्स व इतर कामांचा समावेश ‘ब’ संवर्गात करण्यात आला. मात्र, ही कामे प्रत्यक्षात अत्यावश्यक स्वरूपाची असून त्यांना ‘अ’ संवर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ते दुरुस्ती, चेंबर उचलणे, विसर्जन कुंडातील गाळ उपसणे यासारखी कामे तातडीने करावी लागतात. त्यासाठी कामगारांना रोजंदारीवर पैसे द्यावे लागतात. मात्र, दुसरीकडे बिले रखडल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे असोसिएशनने म्हटले होते.
उर्वरित बिलांची कार्यवाही नियमानुसार
करण्यात येणार : डॉ. जवळगेकर
सोलापूर महापालिका अंतर्गत मक्तेदारांकडून विविध कामे करण्यात आली होती. त्यांच्या बिलांपैकी सुमारे दहा कोटी रुपयांची बिले बुधवारी अदा करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उर्वरित बिला संदर्भातील कार्यवाही नियमानुसार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी दिली.
—
Post Views: 9