बार्शी – आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री भगवंत मंदिर, मंदिर परिसर, भगवंत रथ प्रदक्षिणा मार्ग तसेच शहरातील विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तामध्ये महा पोलीस मित्र संघाकडून उत्स्फूर्त आणि महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले.
संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिताताई लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली महा पोलीस मित्र संघातील ३० महिला आणि ५० पुरुष पदाधिकारी व सदस्यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उत्कृष्ट पद्धतीने बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा सुरळीत ठेवण्यासाठी या ५० पुरुष व ३० महिला सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यातही खंबीर साथ
आषाढी एकादशीच्या बंदोबस्तानंतर लगेचच दि.१ ऑगस्ट रोजी शहरात आगमन झालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान रामेश्वर मंदिर व भगवंत मंदिर परिसरात महा पोलीस मित्र संघाच्यावतीने पुन्हा एकदा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखीच्या आगमनामुळे झालेली भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता, संघाने पोलीस प्रशासनास मोलाचे सहकार्य केले.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा मजबूत करणे आणि सण-उत्सवांच्या काळात सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य करणे हेच आमचे कर्तव्य आहे, असे अध्यक्षा लष्करे मॅडम यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी आणि शिस्तबद्ध सेवाभावाची जपवणूक करत महा पोलीस मित्र संघाने पार पाडलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून संघाचे कौतुक होत आहे.
Post Views: 7