टेंभुर्णी – माढा तालुक्यातील चौभेपिंपरी येथील देवकरवस्ती येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख ८० हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना श्रीधर जगताप (वय ३०, रा. देवकरवस्ती, चौभेपिंपरी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. त्या अकलूज येथील एका औषधनिर्मिती कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आजारी असल्यामुळे पती श्रीधर जगताप यांनी त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर ते पुन्हा घरी येऊन जनावरांची देखभाल करून पत्नीला भेटण्यासाठी पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोंडा कापून तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उचकले आणि त्यातील मौल्यवान दागिने, रोकड तसेच कपाटाच्या चाव्यांचा जुडगा चोरून नेला.
चोरी झालेल्या ऐवजात ४५ ग्रॅम वजनाची सोन्याची गंठण, १५ ग्रॅमची मिनी गंठण, १० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, चांदीच्या पैंजणाच्या तीन जोड्या, सुमारे १० हजार रुपयांची रोकड, तसेच कपाटाच्या चाव्यांचा जुडगा असा एकूण ३ लाख ८० हजार १०० रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
१ ऑगस्ट रोजी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३०/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संसार बावकर तसेच पोलिस उपनिरीक्षक गणपत सरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.
या धाडसी घरफोडीमुळे देवकरवस्ती व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बंद घरे असलेल्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.