धाराशिव – जिल्ह्यातील तुळजापूर येथे राजेश श्रीमंत पवार या दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीवर झालेला अत्याचार व शोषणाचा प्रकार संपूर्ण समाजाला हादरवणारा असून माणुसकीला काळिमा फासणारा आहे. या घृणास्पद प्रकरणातील आरोपींवर तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार आणि आक्रमक मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था (राज्य) यांच्या वतीने पोलिस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, दिनांक 22/12/2025 रोजी संबंधित दिव्यांग मूकबधिर व्यक्तीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. हा प्रकार केवळ एक गुन्हा नसून दिव्यांग व्यक्तींच्या असहायतेचा गैरफायदा घेत केलेले गंभीर Exploitation आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात FIR दाखल असतानाही आरोपी खुलेआम फिरत असून पीडित व्यक्तीला धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
IPC, दिव्यांग हक्क अधिनियम 2016, नियम 2017 तसेच शासन निर्णय दि. 13/11/2025 अस्तित्वात असतानाही आरोपींवर कारवाई होत नसेल, तर हे कायद्याचे सरळसरळ अपयश असल्याची तीव्र शब्दांत टीका प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने केली आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच पीडित दिव्यांग व्यक्तीस संपूर्ण पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष व मराठवाडा अध्यक्ष मयूर काकडे यांनी सादर केले. यावेळी बाळासाहेब पाटील, महादेव चोपदार, महेश माळी यांच्यासह शाखाध्यक्ष कुमार नरवडे, शाखा उपाध्यक्ष अमोल पाडे, शाखा सचिव शशीकांत सोनवणे, शाखा सहकोषाध्यक्ष मारुती कांबळे, शाखा सहाय्यक कृष्णा राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“दिव्यांग व्यक्तींवरील अन्याय सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ न्याय न दिल्यास प्रहारचा लढा रस्त्यावर उतरून अधिक तीव्र केला जाईल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
















