वळसंग – दक्षिण सोलापूर आहेरवाडी येथे शेतात झोपलेल्या सचिन अभिमन्यू सासवे याच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या धोंडीबा हनुमंत छत्री व त्याचा मुलगा आयुष्य धोंडीबा छत्री या दोघांना अक्कलकोट न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सचिन सासवे हा शेतात झोपलेला असताना त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी वळसंग पोलिसांनी धोंडीबा छत्री व आयुष्य छत्री यांना अटक करून न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपींतर्फे अँड. संजय गायकवाड यांनी आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसून संशयावरून अटक करण्यात आल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रथम चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने वाढीव पोलीस कोठडीची मागणी नामंजूर करून दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींची सोलापूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
आरोपींतर्फे अँड. संजय गायकवाड, वळसंग हे न्यायालयीन कामकाज पाहत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास वळसंग पोलीस करीत आहेत. आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत अद्याप सिद्ध झालेले नाहीत.