बार्शी – सायकल रायडर्स सोलापूर आयोजित “सायक्लोथॉन २०२६” स्पर्धेत बार्शी सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला.
सायकलिंगचा प्रसार, आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत बार्शी सायकलिंग क्लबचे सहा सायकलपटू सहभागी झाले होते. यामध्ये अमृत खेडकर यांनी ५० कि.मी. अंतर अवघ्या १ तास ३२ मिनिटांत पूर्ण करत सरासरी ३२ कि.मी./ताशी वेग राखून द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच डॉ. कुमार जगताप, डॉ. नवदीप लोकरे, अमोल ताकभाते, रणजीत पाटील आणि लक्ष्मण नलवडे यांनीही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत क्लबचा गौरव वाढवला.
सोनी कॉलेज येथून सुरु झालेल्या या सायक्लोथॉनमध्ये एकूण १७५ नोंदणींपैकी १४० सायकलपटूंनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. स्पर्धेची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सायकलपटूंना पदके देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, अमृत खेडकर हे सायकलिंग व फिटनेस क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. काश्मीर ते कन्याकुमारी हा देशव्यापी सायकलिंग प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करुन त्यांनी जिद्द, चिकाटी आणि साहसाचे दर्शन घडवले आहे. तसेच प्रतिष्ठेची आयर्नमॅन (Ironman) स्पर्धा पूर्ण करणारे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पहिले पोलीस कर्मचारी म्हणून त्यांनी मानाचा बहुमान मिळवला आहे.
याशिवाय त्यांनी बीआरएम (BRM) सारख्या अत्यंत आव्हानात्मक लांब पल्ल्याच्या सायकलिंग स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. सायकलिंग, धावणे आणि फिटनेस क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण यशामुळे ते बार्शी व सोलापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
बार्शी सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, या यशामुळे क्लबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Post Views: 19