बार्शी – शहरातील फिनिक्स पोदार लर्न स्कूल (CBSE पॅटर्न) ने माध्यमिक शालांत परीक्षेत सलग तिसऱ्या वर्षी १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत शैक्षणिक क्षेत्रात आपले अग्रस्थान पुन्हा सिद्ध केले आहे.
यंदा शाळेचा विद्यार्थी समर्थ वैभव गवळी याने 98% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा विद्यार्थी तालुक्यात अव्वल ठरला आहे.
तसेच शाळेचे सहा विद्यार्थी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये समृद्धी शिवाजी कांबळे (96.4%), अक्षरा सोमेश्वर देशमाने (96.2%), हिंदवी हनुमंत इंगळे (95.8%), विराज विजयकुमार आडकर (95.4%), आणि रिचा विशाल गुगळे (94.6%) या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करुन शाळेचा लौकिक वाढवला आहे.
शाळेच्या स्थापनेपासून अवघ्या सहा वर्षांच्या कालावधीतच फिनिक्स पोदार लर्न स्कूलने सलग तीन वर्षे 100% निकालाची परंपरा कायम राखली असून, सलग दोन वर्षे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मानही मिळवला आहे.
यंदा 100 पैकी 100 गुण मिळवणारे मराठीत पाच व माहिती तंत्रज्ञान विषयातही चार विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान मिळवले आहे. शाळेचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे, तर कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि मूल्य शिक्षणातही आघाडीवर आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल, स्केटिंग, तिरंदाजी, धावणे, जलतरण, बुद्धिबळ, टेबल टेनिस, क्रिकेट आणि खो-खो या क्रीडा प्रकारांत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.
पूर्व-प्राथमिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेत डिजिटल क्लासरुम, मेडिटेशन, योग, कवायत तसेच विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो. दैनंदिन परिपाठातून मूल्य शिक्षणावर विशेष भर दिला जातो.
शाळेच्या मार्गदर्शक विजय कबाडे, संस्थेच्या अध्यक्षा वैशाली कबाडे, सचिव संदीप बरडे आणि मुख्याध्यापक रविराज बेलुरे यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.
























