बार्शी – सुयश विद्यालय, बार्शी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीच्या कार्याचे स्मरण केले.
महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली. तर लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या साध्या राहणी मानातून, कर्तव्यनिष्ठेतून आणि देशसेवेच्या कार्यातून संपूर्ण देशासमोर आदर्श निर्माण केला. ‘जय जवान, जय किसान’ हा त्यांचा प्रेरणादायी नारा आजही देशवासीयांना प्रेरणा देतो.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिस्त, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. महापुरुषांचे विचार आत्मसात करुन आदर्श नागरिक बनण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री. शिवदास नलावडे, संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलावडे, मुख्याध्यापिका सौ. अलका जगतापश, उपमुख्याध्यापक येवले सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.