सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने आणलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा भारतीय जनता युवा मोर्चाने बुधवारी निषेध केला. चार हुतात्मा पुतळा चौकात जोरदार घोषणाबाजी करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले.
महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा धिक्कार असो, फुल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है, भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे म्हणाले, मुख्यतः काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षांची भूमिका आजवर महिला विरोधी राहिली आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्ष महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतात. परंतु महिलांसाठी योगदान देण्याची वेळ आली की महिला विरोधी भूमिका घेतात, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महिलांना आरक्षण मिळवून देणाऱ्या विधेयकाचा विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. आगामी काळात देशातील जनता काँग्रेस आणि विरोधी पक्षांना याची शिक्षा नक्की देईल, असेही भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे याप्रसंगी म्हणाले. यावेळी किरण माशाळकर यांनीही भाषणातून विरोधकांचा निषेध केला.
या निषेध आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, नगरसेविका मृण्मयी गवळी, अनिल वंगारी, यतीराज होनमाने, अर्जुन मोहिते, राहुल डांगरे, विशाल बनसोडे, रोहन मराठे, ओंकार शिंदे, देवेंद्र डेरबेरे, अंबादास पामू, डोंगरेश चाबुकस्वार, नाजनीन शेख, सायरा शेख, किरण माशाळकर, ओंकार होमकर, गणेश पवार, अनिकेत प्रधाने, समर्थ लामकाने, श्रीनिवास दासरी, मयूर घुगे, राघव घनाते, लक्ष्मण सरवदे, ऍड. सतीशकुमार मालवी, सिद्धेश्वर माळी, नरेश दासरी, लखन भोसले, कृष्णा झंवर, रोहित गोरे, अनिल वंजारी, सागर राठी, विशाल अंबलगी, विकास करके, सुमित पतंगे, मंदार मेंडापुरे, रविराज वाघमोडे, प्रदीप मोरे, आकाश मुदगल आदी उपस्थित होते.
———–
खासदार प्रणिती शिंदेनी केला महिलांच्या मतांचा अपमान
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महिला म्हणून या विधेयकाच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता असताना त्यांनीही या विधेयकाला विरोध करून महिलांचा विश्वासघात केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक महिलांनी देखील खासदार प्रणिती शिंदे यांना मत दिलेले आहे. अशावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून महिलांनी दिलेल्या मताचा अपमान केला आहे, असे भाजयुमोचे शहराध्यक्ष विजय कुलथे याप्रसंगी म्हणाले.






















