सोलापूर – मंद्रूप येथील मंडळ कृषी अधिकारी किरण सावंत तीन महिन्यापासून कार्यालयाला दांडी मारत प्रवासभत्ता घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला दांडी मारणार्या मंडळ अधिकार्याला अभय असल्याची चर्चा सुरू आहे . मंडळ कृषी अधिकार्यावर कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मंद्रूपचे मंडळ कृषी अधिकारी किरण सावंत हे जानेवारी महिन्यापासून मंद्रूपच्या कृषी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. मार्च अखेरपर्यंत विविध योजनांची अनुदान प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कृषी सहायकांमार्फत शेतकर्यांपर्यंत विविध योजनांची माहीती पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देणे आवश्यक असताना अतिरिक्त पदभाराच्या नावाखाली सावंत मंद्रूपच्या कार्यालयाला दांडी मारले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी उपस्थित असणे बंधनकारक असताना शासकीय कामकाज असल्याचे सांगत सावंत कार्यालयाकडे न आल्याने तीन महिने मंडळ कृषी कार्यालय बंद होते.
मंडळ कृषी अधिकाऱ्या विरोधात जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर कारवाई न होता बघ्याची भूमिका असल्याने वरिष्ठ अधिकार्यांविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही मंडळ अधिकारी व कृषी सहायकांमधील वादाचे प्रकरण कृषी अधीक्षकांकडे कारवाईविना प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. शिवाय या मंडळ अधिकार्याचे अधिकारी व कर्मचार्यांशी नेहमी वाद होत असल्याने शेतकर्यांच्या योजनांवर परीणाम होत आहे.
त्यामुळे कार्यालयाला दांडी मारणाऱ्या मंडळ कृषी अधिकाऱ्याला वरिष्ठांचे अभय असल्याची चर्चा सुरू असल्याने मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे, बी बियाणे, फळबाग योजना यासह इतर योजनांचा लाभ घेताना समस्या उद्भवत आहेत. मात्र वरिष्ठ अधिकारीच त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कार्यालयाला दांडी मारणार्या मंडळ अधिकार्यावर कारवाई न केल्यास १ मे महाराष्र्ट दिनी आंदोलनाचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.






















