सोलापूर : बोन मॅरो ट्रान्सप्लांट, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि सीएआर – टी सेल थेरपीसारख्या आधुनिक उपचारपद्धतींमुळे रक्ताचा कर्करोग अर्थात ब्लड कॅन्सर आता रुग्णांसाठी आशेचे नवे दालन खुले झाले आहे, अशी माहिती यशोदा हॉस्पिटल, हायटेक सिटी येथील वरिष्ठ रक्तविकारतज्ज्ञ व अस्थिमज्जा प्रत्यारोपण चिकित्सक डॉ. गणेश जयशेतवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एकेकाळी अत्यंत गंभीर मानला जाणारा रक्ताचा कर्करोग अर्थात ब्लड कॅन्सर आता अनेक रुग्णांमध्ये प्रभावीपणे नियंत्रित करता येणारा आणि काही प्रकारांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार बनत आहे. आधुनिक उपचारपद्धती केवळ पारंपरिक केमोथेरपीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. कर्करोगाच्या पेशींना अचूक लक्ष्य करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या प्रगत पद्धती विकसित झाल्या आहेत. भारतात विकसित झालेली स्वदेशी सीएआर – टी सेल थेरपी उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या एएलएल आणि लिम्फोमासारख्या रक्ताच्या कर्करोगासाठी आशादायक ठरत असल्याचे डॉ. जयशेतवार यांनी सांगितले.
हायटेक सिटीतील यशोदा हॉस्पिटलमध्ये डॉ. जयशेतवार यांच्या नेतृत्वाखालील टीमने ५०० हून अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले असून, संस्थेचा यशाचा दर ८० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला.
सीएआर – टी थेरपीद्वारे १० हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.सोलापूर परिसरातील कविता यांनी आठ वर्षांपूर्वी एएमएल या रक्ताच्या कर्करोगावर हाफ-मॅच्ड बोन मॅरो ट्रान्सप्लांट घेतला असून, त्या आज निरोगी जीवन जगत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस अतुल चव्हाण, साई वेंकटेश आदी उपस्थित होते.
ही आहेत आजाराची लक्षणे
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो.अकारण ताप, वजन कमी होणे, रक्तस्त्राव, वारंवार संसर्ग, तीव्र ॲनिमिया किंवा प्लेटलेट्स कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. जयशेतवार यांनी केले.
——-
Post Views: 20