घुरून बघितल्याचा जाब विचारत बेदम मारहाण – सहा जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : घुरून बघितल्याचा जाब विचारत सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना एकता नगर येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज सुर्वे, अनुराग भालेकर, ध्रुव गायकवाड, श्रीधर चनोज, रवी स्वामी आणि गोट्या माने (सर्व राहणार सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत श्रीधर नरेश कुंदाराम ( रा एकता नगर सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी श्रीधर हे २८ मे रोजी रात्री दहा वाजता त्यांचे मित्र अमित शिंदे यांच्यासोबत थांबले असताना, वरील आरोपी हे कारमधून येऊन ” तू मला काल घुरुन का बघत होतास ” असे म्हणून फिर्यादीला गाडीत बसण्यास सांगितले. श्रीधरने नकार दिला असता, सर्व आरोपींनी मिळून त्याला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . हवालदार गायकवाड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
कुमठे येथील शेतातून इलेक्ट्रिक बोर मोटार आणि कॉपर केबल लंपास
सोलापूर : अज्ञात चोरट्यारे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पाण्याच्या कूपनलिकेची मोटार आणि वायर चोरून नेल्याची घटना कुमठे गावच्या शिवारात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली .या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत घुडुभाई कोंडाजी मुल्ला (रा. कर्णिक नगर) यांनी चोरीची फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मुल्ला यांचे कुमठे गावात शेत आहे. २८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातील बोर मधील १२ हजारांची इलेक्ट्रीक बोर मोटार आणि कॉपर वायर चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार शिर्के हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
नवीन गाडीसाठी २ लाख आण म्हणत पत्नीला दिले हाकलून ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
सोलापूर : नवीन मोटर गाडी घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीला घरातून हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती मयूर, सासरे विश्वनाथ, सासू सुनिता आणि उषा (सर्व रा.रघुनंदन निसर्ग सोसायटी , बावदन बु . , पुणे)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत निकीता मयूर पांचाळ (वय २१, सध्या रा. आंबेडकर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी निकिता यांचा विवाह पुण्यातील मयूर पांचाळ याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरी नांदत असताना आरोपींनी माहेरून २ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. पैसे न आणल्याने पती आणि सासरच्या लोकांनी तिला बेदम मारहाण व मानसिक त्रास देऊन व्यवस्थित नांदवून न घेता माहेरी हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . हवालदार काळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.