
या हल्ल्यात चंद्रकांत निराळे (५५), दुंडप्पा निराळे (६५), शिवपुत्र निराळे (५८), राहुल निराळे (२५), समर्थ निराळे (२३) आणि शब्बीर अत्तार (४५) यांचा मृत्यू झाला आहे.
जमीनीच्या वादातून खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तक्रारदार चैतन्यकुमार दुंडप्पा निराळे यांच्या फिर्यादीवरून २९ मे रोजी हा गुन्हा नोंदविण्यात आला. गोविंदपूर येथील कल्लणगौड ईश्वरगौड पाटील यांच्यासह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
गोविंदपूर खूनाच्या घटनेनंतर उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विशेष पथकाद्वारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
गोविंदपूर येथील एका जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे गुन्ह्यामध्ये नमूद करण्यात आला आहे. निवरगी गावातील तेली कुटुंबाची जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. पाच ते सहा महिन्यांपूर्वी निराळे कुटुंबाने ती जमीन विकत घेतली होती.
जमिनीवरील काटेरी झुडपे काढून साफसफाईचे काम सुरू असताना आरोपींनी विरोध केला. या संदर्भात तहसीलदार न्यायालयातही वाद सुरू असून निकाल निराळे कुटुंबाच्या बाजूने लागला होता. त्यानंतरही आरोपींनी घटनास्थळी येऊन पीडितांच्या डोळ्यांत तिखट पावडर फेकली आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तेली कुटुंबातील एका युवतीशी कल्लणगौड पाटील यांच्या मुलाने पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर झालेल्या वैमनस्यातून त्याचा ट्रॅक्टरखाली चिरडून खून करण्यात आल्याचा जुना गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणानंतर संबंधित जमीन अनेक वर्षे पडीक राहिली होती. पुढे ती जमीन निराळे कुटुंबाने खरेदी केल्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर या भीषण हत्याकांडात झाल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी शवविच्छेदनानंतर चडचण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.






















