सोलापूर – कामासाठी परगावी राहणाऱ्या एका दांपत्याच्या घरातून अज्ञात चोरट्याने चांदीचे ताट,भांडी, पितळी मुर्त्या, टीव्ही, पाण्याची मोटर मिळून साठ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना होटगी रोडवरील गंगाधर सोसायटीत नुकतीच उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनुजा गुरशांत स्वामी (रा. ५ गंगाधर हौसिंग सोसायटी, होटगी रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी महिला या पुण्यात खाजगी मध्ये काम करतात. त्यामुळे त्या पुण्यात राहतात आणि महिना – पंधरा दिवसाला सोलापुरात येतात. त्याप्रमाणे फिर्यादी या दि. २९ ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून पती सह पुण्याला गेल्या होत्या. त्या दि. २७ सप्टेंबर रोजी सोलापूरला परतल्या असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. फिर्यादी या पुण्याला असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरात मागील बेडरुममध्ये उघडया राहिलेल्या दरवाजातून आत प्रवेश करुन चांदीचे ताट, पितळी साहित्य, टिव्ही, देवीचे पितळी मुर्त्या, स्टीलचे नळ, पंखे, पाण्याची मोटार, मिक्सर, वायर असे एकूण ५९ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार हार हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.