सोलापूर – ग्राहकांची परवानगी नसताना ब्रोकर नेमून कमिशनच्या नावाखाली रक्कम वजा करणाऱ्या एसबीआय म्युच्युअल फंडाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सोलापूर यांनी दणका दिला आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने ग्राहकाची गुंतवणूक थेट असताना ब्रोकरमार्फत केल्याचे दाखवून सेवेत त्रुटी केल्याप्रकरणी गुंतवणूकदार विजयकुमार वासुदेव अंकम यांना ब्रोकर कमिशनची रक्कम ६% व्याजासह परत करण्याचा आणि १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.
तक्रारदार श्री. विजयकुमार अंकम (रा. सागर चौक, विडी घरकुल, सोलापूर) यांनी दि. १२/०६/२०१२ पासून SBI म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली होती. दि. १७/०८/२०१८ पासून त्यांच्या खाते उताऱ्यावर अचानक ब्रोकर म्हणून “SBI1928 / State Bank of India – Kadlas S A B” असे नाव दिसू लागले. प्रत्यक्षात तक्रारदार यांनी कोणत्याही ब्रोकरची नेमणूक केली नव्हती किंवा SBI कडलास शाखेला कधीही भेट दिली नव्हती.
एसबीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंड या दोन वेगवेगळ्या कंपन्या असताना नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेऊन दोन्ही एकच असल्याचे तोंडी सांगितले जात होते, तसेच शाखेत बोर्ड किंवा बॅनरही लावलेला नव्हता, असा आरोप तक्रारदारांनी केला होता. दि. १०/०२/२०२१ रोजी त्यांनी SBI Retirement Aggressive Fund मधील १५,००० रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यासाठी अर्ज केला असता, आजपर्यंत ती रक्कम परत केली नाही.
विरुद्ध पक्ष (SBI म्युच्युअल फंड कंपनी) यांनी, तक्रारदार हे माजी कर्मचारी असून त्यांनी लॉक-इन कालावधीचा उल्लेख केला. मात्र, आयोगाने आपल्या कारणमिमांसेत स्पष्ट केले की, तक्रारदार यांनी थेट गुंतवणूक केली असताना खाते उताऱ्यावर ब्रोकरचे नाव येण्याचे कोणतेच कारण नाही. गुंतवणूक ब्रोकरद्वारे करून विरुद्ध पक्षाने (एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी) सेवेत त्रुटी केली आहे हे सिद्ध होते.
या प्रकरणी अध्यक्ष सौ. भारती स. सोळवंडे आणि सदस्य सौ. मनिषा व. वनमोरे यांनी तक्रार अंशत: मंजूर करून आदेश दिला की, विरुद्ध पक्ष क्र. १ (एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी) यांनी दि. १७/०८/२०२० पासून ५ वर्षांच्या कालावधीत ब्रोकर म्हणून वजा केलेले कमिशन तक्रार दाखल तारीख ३०/०१/२०२४ पासून प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत ६% व्याजाने तक्रारदारास अदा करावे. तसेच मानसिक त्रासापोटी १०,००० रुपये आणि तक्रार खर्चापोटी ५,००० रुपये ४५ दिवसांच्या आत द्यावेत.
या निकालामुळे बँक आणि म्युच्युअल फंडाच्या नावाात गोंधळ घालून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकाराला चाप बसणार आहे.
Post Views: 18