सोलापूर – येथील विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात ‘करिअर’ संघाने ‘केपीसीए क्लब’चा ४८ धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. ‘करिअर’ संघाच्या झैद नदाफने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत उत्कृष्ट कामगिरी करत सामन्यावर आपले वर्चस्व गाजवले.
इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ‘करिअर’ संघाने निर्धारित ४० षटकांत ९ बाद २०६ धावांचे आव्हानात्मक आव्हान उभे केले. यामध्ये नादाफ झैदने ५७ धावांची तर तनवीर शेखने ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. केपीसीए क्लबकडून गोलंदाजीत श्रेयस सुरवेसे आणि हुचेश्वर कांबळे यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले, तर सनी पोल व मायंक पात्रे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
२०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केपीसीए क्लबचा डाव ३१.५ षटकांत सर्वबाद १५८ धावांवर आटोपला. केपीसीए कडून मायंक पात्रेने २८ धावा केल्या, तर हर्षवर्धन २४ धावांवर नाबाद राहिला. करिअर संघाकडून भेदक गोलंदाजी करताना झैद नादाफने ५ बळी घेत केपीसीएच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले, त्याला खिझर शेखने ३ बळी घेत उत्तम साथ दिली.
उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल झैद नदाफ याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यासाठी पंच म्हणून अनिल सलगर आणि सूरज गायकवाड यांनी तर गुणलेखक म्हणून शुभम मुत्तुर यांनी काम पाहिले.
Post Views: 7