पंढरपूर – मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते नुकतेच पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथे जाऊन दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी खासदार शिंदे यांनी अपघातानंतरच्या उपचारांची माहिती घेत धोत्रे यांना धीर देत लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.
अपघाताची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून दिलीप धोत्रे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दूरध्वनीद्वारे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच विविध पक्षांतील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटी देत त्यांना धीर दिला.
दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात येत असल्याने पंढरपूर येथील सामान्य नागरिकांसाठी कायम मदतीला धावून येणारे धोत्रे यांच्या पाठीशी साक्षात विठ्ठल असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Post Views: 7