सोलापूर : आगामी मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आज सोमवार रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती .
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कारंजे, पोलिस उपायुक्त वृष्टी जैन, डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, आरटीओ अधिकारी आसिफ मुलाणी, अग्निशामक अधिकारी रावसाहेब सलगर शांतता समिती सदस्य, महानगरपालिका अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, मौलाना उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्तांनी मोहरमच्या दोन्ही समित्या बरखास्त असून त्यांना वर्गणी गोळा करण्याचा कोणताही अधिकार नाही. याबाबतचे पत्र वक्फ बोर्ड कार्यालयाकडून प्राप्त झाले असून हे पत्र दोन्ही कमिट्यांना दिले जाणार असल्याचे सांगितले . शिवाय मोहरम सण शांततेत साजरा करावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
आयुक्त पुढे म्हणाले, कोणत्याही धार्मिक स्थळी आक्षेपार्ह भाष्य किंवा वक्तव्य केले जाणार नाही, याची संबंधितांनी काळजी घ्यावी. पंजे व सवारीच्या संरक्षणासाठी संयोजकांनी आपापले स्वयंसेवक नेमावेत आणि मोकाट जनावरांपासून त्यांना धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. विनापरवाना कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही.
नागरिकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामंजस्याने वागावे. सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड न करता ते त्वरित डिलीट करावेत आणि जातीय सलोखा अबाधित राखावा. शिवाय, वक्फ बोर्ड कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, सध्या कार्यरत असलेल्या दोन्ही मोहरम समित्यांना वर्गणी जमा करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या, ज्यावर उपस्थित महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
चौकट –
मोहरम मिरवणुकीदरम्यान विनापरवाना मिरवणूक काढू नये, मिरवणूक मार्गावरील धार्मिक स्थळांचा आदर राखावा, कोणत्याही धार्मिक स्थळासमोर आक्षेपार्ह कृत्य किंवा नाच-गाणी करू नयेत, तसेच सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह संदेश, फोटो अथवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. संशयास्पद अथवा अनुचित घटना निदर्शनास आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Post Views: 31