सोलापूर – ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांसह शाळा, अंगणवाडी आणि वैयक्तिक घरगुती शौचालयांची तपासणी करण्यात येणार आहे. विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींना स्वच्छतागृहांचा सुरक्षित व सुलभ वापर करता यावा, यावर भर दिला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. यंदाच्या जागतिक शौचालय दिनाची ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ (Safe Toilets, Equal Futures) ही संकल्पना असून, त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. २० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
अभियानादरम्यान सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमधील पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, आवश्यक साहित्य, मलमूत्र व्यवस्थापन तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीची व्यवस्था तपासली जाणार आहे. आवश्यकतेनुसार शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात येईल. वैयक्तिक घरगुती शौचालयांची स्थिती तपासून त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील एक खड्डा शौचालयांचे दोन खड्ड्यांच्या शौचालयांमध्ये रूपांतर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार सेप्टिक टँक व्यवस्थेचे अद्ययावतीकरण आणि मैला गाळ व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. शौचालयांमधील गाळाची यांत्रिक पद्धतीने सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमधील स्वच्छतागृहांचीही विशेष तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता आणि साबणाने हात धुण्याच्या सवयींबाबत जनजागृती केली जाणार आहे. शालेय स्वच्छता परीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमांमधील सहभाग वाढविण्यात येईल. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहांचा सहज वापर करता यावा, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, स्वच्छता ही केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांचे आरोग्य, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छतागृहांचा सुरक्षित आणि नियमित वापर सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.
चौकट
उत्कृष्ट शौचालय स्पर्धेत ग्रामपंचायतींचा गौरव
या अभियानांतर्गत सार्वजनिक, सामुदायिक, संस्थात्मक आणि वैयक्तिक घरगुती शौचालयांसाठी उत्कृष्ट शौचालय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने उत्कृष्ट सार्वजनिक, संस्थात्मक आणि वैयक्तिक घरगुती शौचालयांची निवड करायची आहे. त्यानंतर पंचायत समिती स्तरावर उत्कृष्ट शौचालयांची निवड करून जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर केले जातील. अभियानाच्या सांगता कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शौचालयांसह संबंधित ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.
कोट
ग्रामसेवकांनी विशेष लक्ष द्यावे : भुजबळ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही या विशेष स्वच्छता मोहिमेची मदत होणार आहे. त्यामुळे सर्व प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामसेवकांनी या मोहिमेकडे विशेष लक्ष देऊन शौचालयांची स्वच्छता, देखभाल आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी केले.
Views: 6