मोडनिंब – श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या २१ फूट उंच आणि सुमारे दोन टन वजनाच्या भव्य मूर्तीच्या कामाचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संत सावता माळी महाराजांचे १७ वे वंशज रमेश महाराज वसेकर, ह.भ.प. बाळासाहेब ससाणे, भाजपचे नेते प्रदीप गारटकर तसेच नगराध्यक्ष भरत शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
शिल्पकार विक्रम वाघमोडे यांच्या ‘गंधर्व आर्ट स्टुडिओ’मध्ये आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, नगरसेवक शुभम पवार, गणेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उंबरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. बाळासाहेब ससाणे यांच्या पुढाकारातून साकारण्यात येणारी ही भव्य मूर्ती संत सावता माळी महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र अरण( ता. माढा) येथे प्रतिष्ठापित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


























