सोलापूर : समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डोळसपणे पाहता आले पाहीजे. त्यासाठी आपल्याकडे कुतूहल असले पाहिजे. कुतूहल हा ज्ञान प्राप्तीचा पहिला टप्पा आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.
ब्राह्मण समाज सेवा संघातर्फे रविवारी शिवस्मारक सभागृहात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने तर जेष्ठ अभियंता हरी मुस्तीकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक हरी गोडबोले होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. त्र्यंबक लक्ष्मण चाटी ट्रस्टच्या अध्यक्षा मीना चाटी, ब्राह्मण समाज सेवा संघाचे अध्यक्ष दत्तराज कुलकर्णी, ट्रस्ट आणि सेवा संघाचे सचिव राम तडवळकर उपस्थित होते.
जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर पुढे म्हणाले, सध्या समाजाला वस्तुनिष्ठ पत्रकारितेची गरज आहे. पूर्वीच्या काळात पत्रकारितेला गांभीर्य होते. हे गांभीर्य हरवत चालले आहे. समाज मनाचा कानोसा घेण्यासाठी विचारशक्ती वाढवली पाहिजे. पालकांसारखा उत्तम शिक्षक नाही.
शिक्षक आणि पालक यांनी मुलांचे कुतूहल जागे ठेवणे आवश्यक आहे. शिकायचे कसे हे मुलांना शिकवण्याची गरज आहे.
भारताची संस्कृती आणि संविधान जोपर्यंत भक्कम आहे तोपर्यंत भारताच्या सार्वभौमत्वाला कोणीही धक्का लावू शकत नाही. आपली पाळेमुळे विसरली की संस्था, राजकीय पक्षांचा ऱ्हास होतो. याचे प्रत्यंतर राज्यात, देशात अनेक संस्थांमध्ये येत आहे, असेही श्री. तोरसेकर यांनी सांगितले.
डॉ. त्र्यंबक लक्ष्मण चाटी ट्रस्ट आणि ब्राह्मण सेवा संघाचे सचिव राम तडवळकर यांनी प्रास्ताविक केले. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर संचालक वामन कुलकर्णी यांनी आभार मानले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक महेंद्र देवस्थळी, सुधीर तडवळकर, जितेश कुलकर्णी, संजय कुलकर्णी, सुधीर तडवळकर, सुधीर कुलकर्णी, रणजित विश्वरूपे, डॉ. गिरीश कुमठेकर, दैदिप्य वडापूरकर आदींसह समाज बांधव नागरिक उपस्थित होते.
——-
चौकट
*समाजभूषण आणि जीवन गौरव पुरस्कार*
जेष्ठ अभियंते हरी मुस्तीकर यांना समाज भूषण तर भाऊ तोरसेकर
यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
मानपत्र, पगडी आणि २५ हजार रुपये रोख असे दोन्ही पुरस्काराचे स्वरूप होते.
——-
चौकट
*पुरस्काराची रक्कम संस्थेसाठी*
हरी मुस्तीकर यांनी पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम संस्थेला देणगी म्हणून दिली. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
Post Views: 4