सोलापूर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांची नाशिकला जिल्हा उपनिबंधकपदी बदली झाल्याने आता प्रशासकपदी मुंबई येथील अपर निबंधक योगीराज सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा बदल केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
उच्च न्यायालयाने चार आठवड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता काही दिवसात बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता असताना सुर्वे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.
मात्र ते जिल्हा बँकेचा पदभार स्वीकारतील की नाही. याबाबत सहकार विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.