सोलापूर : शहरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा गंभीर अभाव असल्याने धार्मिक स्थळे (दर्गा), कब्रस्तान विकास आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या सर्वांगीण सुधारणेसाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी शाब्दि सोशल अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. फारूक शाब्दि यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुस्लिम वस्त्यांमध्ये लोकसंख्या घनता मोठी असून स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधांची कमतरता तीव्र आहे. विशेषतः दर्गा व कब्रस्तानांचा विकास अपुरा असून, जुनी व क्षमतेला न बसणारी ड्रेनेज व्यवस्था नागरिकांसाठी मोठा त्रास ठरत आहे. दर्गा आणि कब्रस्तान ही केवळ धार्मिक स्थळे नसून सामाजिक व सांस्कृतिक केंद्रे असल्याचे नमूद करत, या ठिकाणी कंपाऊंड भिंत, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता सुविधा आणि वृक्षारोपण यांसारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
तसेच, सध्या अस्तित्वात असलेली 6 इंच क्षमतेची ड्रेनेज लाईन वाढत्या लोकसंख्येस अपुरी पडत असून पावसाळ्यात पाणी साचणे, घाण सांडणे आणि दुर्गंधी पसरल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे ही लाईन बदलून 18 इंच क्षमतेची आधुनिक ड्रेनेज लाईन बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढीलप्रमाणे निधीची मागणी करण्यात आली आहे — शाहजहूर दर्गा (1 कोटी रुपये), मलंग शाह वली दर्गा (75 लाख), जडेशाब कब्रस्तान (75 लाख), मोदी कब्रस्तान (75 लाख), नयी जिंदगी कब्रस्तान (1 कोटी) आणि ड्रेनेज सुधारणा (5 कोटी). या सर्व कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून, कामे पूर्ण झाल्यास परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. प्रशासनाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन लवकरात लवकर कामे सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली.
फारूक शाब्दि म्हणाले, मुस्लिम वस्त्यांतील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. दर्गा आणि कब्रस्तान ही आपल्या समाजाची ओळख असूनही त्यांचा विकास दुर्लक्षित राहिला आहे. अपुरी ड्रेनेज व्यवस्था ही आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. आम्ही केवळ मागणी नव्हे तर गरज मांडली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन निधी मंजूर करावा.
यावेळी रियाज खरादि, कोमारो सय्यद, सलीम पामा, याकुब शेख, अजहर शेख, सलीम बेलीफ, वसीम शेख, जुबेर कुरेशी, बशीर शेख, महिबुब अली कुरेशी, आमिर मुचाले, इसाक शेख, अखलाख कुरेशी, वसीम डी, जावेद बेगमपुरे आदी उपस्थित होते.

























