
सोलापूर – गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करणाऱ्या ‘रामेश्वर बुक बँक’ या संस्थेच्या वतीने अक्कलकोट रोडवरील समाधान नगर कामगार वस्तीतील अंगणवाडीमध्ये बालकांना पाटी, पेन्सिल, खडू आणि पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.
जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या सहकार्यातून हा उपक्रम पार पडला. काही दिवसांपूर्वी ९ वी, १० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, तसेच ५० लहान मुलांसाठी पाटी-पेन्सिलची आवश्यकता असल्याचा संदेश सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत श्री. रेम्बर्सु यांनी सर्व साहित्य संस्थेकडे सुपुर्द केले.
या साहित्याचे वाटप समाधान नगर येथील अंगणवाडीत संजय पाटील यांच्या हस्ते व मल्लिनाथ याळगी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा चिकशेट्टी, आरती जाधव, पूनम उपाडे, ज्योती जाधव, माधवी जाधव, सिद्धाराम याळगी यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी शिक्षिका पूनम पाटील यांनी केले. मदतनीस रेखा भोसले यांनी आभार मानले.



















