सोलापूर – दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, सोलापूर जिल्ह्यात या परीक्षांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३१२ विद्यार्थी या फेरपरीक्षेला सामोरे जाणार असून, त्यांना शैक्षणिक वर्ष वाया न घालवता पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील दहावीच्या फेरपरीक्षेसाठी २ हजार ९६ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. ही परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोलापूर, करमाळा, कुडुवाडी, अकलूज, गादेगाव, अक्कलकोट आदी ठिकाणी एकूण आठ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर केंद्रचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान, बारावीच्या फेरपरीक्षेसाठी ४ हजार २१६ विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा १६ जून ते ४ जुलै या कालावधीत होणार असून, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, अकलूज, बार्शी, सांगोला आणि करमाळा येथे परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी केंद्रस्तरावरील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच परीक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
चौकट
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी
फेरपरीक्षा ही केवळ अपयशी विद्यार्थ्यांसाठी नसून गुण सुधारणा आणि शैक्षणिक प्रगतीसाठीही महत्त्वाची संधी मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उर्वरित कालावधीत नियोजनबद्ध अभ्यास करून या संधीचे सोने करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
चौकट
फेरपरीक्षेची आकडेवारी
दहावीचे विद्यार्थी : २,०९६
बारावीचे विद्यार्थी : ४,२१६
एकूण विद्यार्थी : ६,३१२
दहावी परीक्षा कालावधी : १६ ते ३० जून
बारावी परीक्षा कालावधी : १६ जून ते ४ जुलै
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे : ८