सोलापूर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे करण्यात आली.
बदली रोजंदारीवरील २४९ कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो नगरविकास विभागाकडे तातडीने पाठवावा. मनपा कर्मचाऱ्यांसाठी मंजूर झालेली कॅशलेस मेडिकल इन्शुरन्स योजना त्वरित कार्यान्वित करावी, मनपा कर्मचाऱ्यांनाही शासनाप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता लागू करावा आणि बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा २०० रुपयांची वाढ करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अर्जित रजेची थकीत रक्कम अदा करणे, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देणे, सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १०, २० व ३० वर्षांची प्रकरणे विभागप्रमुखांमार्फत मंजूर करणे, जूनमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची वेतनवाढ लागू करून पेन्शन निश्चित करणे, घनकचरा विभागातील १५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर विनायक कोंड्याल यांनी दिल्याची माहिती युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी उपमहापौर नाना काळे यांची उपस्थिती होती. यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, माऊली पवार, सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल, मार्गदर्शक इकबाल तडकल, खजिनदार अरुण मेहेत्रे, प्रमुख संघटक दिनेश बनसोडे, बिभीषण गायकवाड तसेच ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
—
Post Views: 5