पंढरपूर – एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाची माहिती देताना स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी सांगितले की, देशाच्या विकासामध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि समाजोपयोगी अभियांत्रिकी उपाययोजनांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे.
यावेळी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख आणि प्रा. गणेश लकडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अभियंता दिनाचे महत्त्व, सर एम. विश्वेश्वरय्या यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर स्थापत्य अभियंत्यांसमोरील संधी याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील नवकल्पना, तांत्रिक कौशल्ये, व्यावसायिक नैतिकता आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राविषयी उत्साह, नवकल्पनांची प्रेरणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.
Post Views: 9