सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साह, आनंद आणि भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी माजी विद्यार्थिनी ऋतुजा जवंजाळ उपस्थित होत्या. मनोगतात उपप्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कर्तृत्वातून महाविद्यालयाचे नाव देशभर उज्ज्वल करावे असे आवाहन केले. प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना यशासाठी सातत्य, मेहनत आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. विभागप्रमुख प्रा.विशाल भाकरे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा.शरद आदलिंगे यांनी व्यावसायिक आयुष्यात गुणवत्तेला आणि नैतिकतेला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सांस्कृतिक सादरीकरणे, मनोरंजनात्मक उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पृथ्वीराज गुंड यांनी केले. आभार डॉ.वाघेशा मथडा यांनी मानले.