टेंभुर्णी – येथील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी टेंभुर्णी येथील डोळ्यांचे प्रसिद्ध डॉक्टर आनंद खडके यांची कन्या गाथा खडके हिची डाकर २०२६ युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या नेमबाजी संघात निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे टेंभुर्णीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि स्वतःवरील अढळ विश्वासाच्या बळावर गाथाने हे यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने महात्मा फुले विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गाथाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विविध क्षेत्रांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी , महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, आमदार अभिजीत पाटील, तिसऱ्या गाडीचे नेते रावसाहेब नाना देशमुख ,वैभव कुटे, विद्यालयाचे संस्थापक नारायण भानवसे, मुख्याध्यापक विजय यादव तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक विजय यादव म्हणाले, “गाथाचे हे यश आमच्या संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या जिद्दीमुळे आज टेंभुर्णीचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. तिच्या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल.”
संस्थापक नारायण भानवसे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही. गाथाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नाव अधिक उज्ज्वल करावे, हीच आमची मनःपूर्वक शुभेच्छा.”
गाथाच्या निवडीमुळे टेंभुर्णी शहरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या आगामी स्पर्धेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post Views: 12