सोलापूर : पाठीवर चापट मारल्याचा रोष मनात धरून दोन महिलासह चौघा जणांनी माजी नगरसेविका पुत्रास जबर मारहाण केलीय. ही घटना रेल्वे लाईन परिसरातील कोनापुरे चाळीत रविवारी दुपारी घडली. रविराज ऊर्फ जोएल जॉन फुलारी असं जखमी तरुणाचं नाव आहे. या मारहाणीत त्याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन काढून घेण्यात आलीय. याप्रकरणी चौघा जणाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस माहिती कक्षातून सांगण्यात आले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रेल्वे लाईन-कोनापुरे चाळीतील रहिवासी तथा माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांचा मुलगा रविराज उर्फ जोएल, त्याच्या घरासमोरील मोकळ्या पटांगणात त थांबला होता. तो बेसावध स्थितीत थांबला असताना, त्याच गल्लीतील लकी नावाच्या मुलाने त्यास सायकलने धडक दिली. त्यातून रविराजने लकीच्या पाठीवर चापट मारली. त्याने लकीला चापट मारल्याचे पाहून आलेल्या चौघांनी रविराजला (वय -१८ वर्षे) खाली पाडून हाताने लाथा-बुक्क्यासह विटांनीही मारहाण केली. या मारहाणीदरम्यान रविराजच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने काढून घेतली. याप्रकरणी जखमी रविराज उर्फ जोएल जॉन फुलारी याने सदर बझार पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 86