पंढरपूर – पांडुरंग रुक्मिणीची सेवा करणाऱ्या येथील बडवे, उत्पात आणि सेवाधारी मंडळींचे वंशपरंपरागत अधिकार जरी शासनाने काढून घेतलेले असले तरी देवाच्या या पुजारी मंडळींशी पिढ्यानपिढ्या पासून असलेला राज्यातील, परराज्यातील भक्तमंडळीचा स्नेहभाव मात्र तुसभर देखील कमी झालेला दिसत नाही.
कारण आज देखील देशातील अनेक जुने राजकारणी, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी, चित्रपट, नाट्यसृष्टी आदी क्षेत्रातील नामवंत मंडळींच्या पंढरपूर भेटीत येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्या नंतर पिढ्यानपिढ्या पासूनचे त्यांचे संबंध असलेल्या बडवे, उत्पात आणि सेवाधारी असलेल्या कुलोपाध्याय मंडळींच्या घरी आवर्जून भेटी देवूनच ते आपला पंढरपूर दौरा पुर्ण करतात.कारण आपसातील पिढ्यानपिढ्या पासूनचे असलेले त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट आहेत की ते अधिकार असले काय ? किंवा नसले काय यामुळे कुठेही सैलसर होत नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही.
याचेच उदाहरण द्यावयाचे म्हटल्यावर नुकतेच महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे पंढरपूर येथे आलेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मीणीचे दर्शन घेतल्यानंतर येथील त्यांचे पिढ्यानपिढ्या पासून कुलोपाध्याय असलेल्या दत्तामामा बडवे यांच्या घरी आवर्जून भेट देत आपुलकीने त्यांची विचारपुस करीत आपले पिढ्यानपिढ्या पासूनचे असलेले स्नेहभाव जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील बडवे, उत्पात आणि सेवाधारी पुजारी मंडळींचे वंशपरंपरागत असलेले देवावरील अधिकार जरी संपुष्टात आणले गेले तरी देवाच्या भक्तांचे या कुलोपाध्याय मंडळींशी असलेले स्नेहभाव मात्र थोडे देखील कमी झाले नसल्याचे यावरुन अधोरेखीत झाल्याचे दिसून आले.
दरम्यान पंढरपूर दौऱ्यावेळी माजी सभापती गुजराथी यांनी विठ्ठलरुक्मीणीचे दर्शन झाल्यानंतर आपले कुलोपाध्याय दत्तामामा बडवे यांच्या निवासस्थानी सस्नेह सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी दत्तामामा यांची स्नेहपुर्वक चौकशी केली. या बरोबरच बडवेमामांचे नातू वरद व सृष्टी यांच्या पर्यावरण कामाबद्दल देखील त्यांनी आवर्जून विचारपूस केली व त्यांच्या कामाला शुभेच्छा ही दिल्या. यावेळी दत्तामामा बडवे यांनी त्यांचे मनापासून स्वागत करून श्रीफळ व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला. गुजराथी परिवार आणि बडवे परिवार यांच्यात पिढ्यानपिढ्यांचे कौटुंबिक व दृढ स्नेहाचे नाते असून,अरुणभाईंनी या परंपरेचे आवर्जून याभेटीच्या वेळी स्मरण केले.
—————–
चौकट : चौकट : ( मंदिर समितीकडून सत्कार )
पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापूरचे व्यापारी राजू राठी, उपाध्याय दत्तामामा बडवे यांचे सुपुत्र विवेक बडवे उपस्थित होते.
—————–
चौकट : ( विठ्ठला दुष्काळ दूर कर )
अरुणभाई गुजराथी यांनी नुकतेच सपत्निक पंढरपूर येथे आगमन करून श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. महाराष्ट्रावर सध्या जे दुष्काळाचे संकट आलेले आहे ते दूर व्हावे व बळीराजा सुखी व आनंदी राहावा अशी प्रार्थना देखील यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी केली.
———————-
चौकट : (घराण्याशी पिढ्यानपिढ्याच्या असलेल्या संबधामुळे मान्यवर मंडळींकडून आवर्जून भेटी)
येथील बाळासाहेब बडवे, विलास भरत बडवे, मदन महाराज हरिदास, (कै.) सुधाकरपंत परिचारक (राजकारणातील दिग्गज म्हणून तर त्यांची ओळख आहेच पण विठ्ठलाचे सेवेकरी म्हणून देखील त्यांची वेगळी ओळख आहे ), भागवताचार्य (स्व.) वा.ना.उत्पात आदींसह येथील अनेक बडवे, उत्पात तसेच सेवाधारी मंडळींच्या घरी कुलोपाध्याय म्हणून राज्यातील, परराज्यातील अनेक मान्यवर मंडळीं आज देखील आपल्या पंढरपूर दौऱ्याच्यावेळी आवर्जून भेटी देत असतात.
———————
चौकट : ( परिचारक बंधुशी साधला संवाद )
या दौऱ्यादरम्यान अरुणभाई गुजराथी यांनी माजी आमदार आदरणीय प्रशांत परिचारक व युटोपियन शुगर्सचे प्रमुख उमेश परिचारक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. केंद्र सरकारतर्फे ‘श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्या’ला उत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी कारखान्याचे चेअरमन प्रशांत व उमेश परिचारक यांचे मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ही फोनवरील चर्चा पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाची होती. आदरणीय (कै.) सुधाकरपंत परिचारक, अरुणभाई गुजराथी आणि दत्तामामा बडवे यांच्यासह परिचारक घराण्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे व स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. त्याच जुन्या आठवणींना उजाळा देत आणि राजकीय विषयांपेक्षा कौटुंबिक आपुलकी जपत ही चर्चा संपन्न झाली.
Post Views: 7