वसईचे माजी आमदार तथा जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉमणिक घोन्सालविस यांचे रविवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, सहा नातवंडे, नातसुना असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज, सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. घोन्सालविस यांना राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
घोन्सालविस यांचा जन्म १४ डिसेंबर १९३० रोजी वसईतील सांडोर येथे झाला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पंचायत समिती सदस्य (१९७० ते १९७२) १३ वर्षे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य, तर १९८५ ते १९९० या कालावधीत वसई मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
बीए पदवी घेतल्यानंतर घोन्सालविस यांनी काही काळ शासकीय मध्यवर्ती प्रेसमध्ये काम केले होते. समाजवादी विचारसणीमध्ये वाढलेल्या घोन्सालविस यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. आमदारकीच्या काळात विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून काम केले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून पराभव झाला.
सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठविला होता. बंगली सोसायटीचे संस्थापक संचालक, बँसीन कॅथॉलिक बँकेचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष, पान मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन (१९६७ ते २००६), कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलचे विश्वस्त, वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, पिगरी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, साधना भांडारचे संस्थापक, साधना सहकारी पतपेढीचे संस्थापक, म. बि. कुलकर्णी ट्रस्टचे अध्यक्ष, पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, लोकसेवा मंडळाचे सचिव अशी विविध पदे भूषविली.
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शोकसंदेशात म्हटले की, सहकार क्षेत्रात कामाचा ठसा उमटविणाऱ्या घोन्सालविस यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. राजकारणात काम करताना वडीलकीच्या नात्याने आमच्यावर टीकाही केली, तर चांगल्या कामासाठी पाठिंबाही दिला. ते आमचे मार्गदर्शक होते.