वेळापूर – महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) संलग्नित ‘रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज’ अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात कार्यरत कृषीकन्यांनी पिसेवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे गाई-म्हशींमध्ये होणाऱ्या ‘लंपी स्कीन डिसीज’ रोगाविषयी जनजागृती मोहीम आणि मोफत लसीकरण अभियानाचे यशस्वी आयोजन केले.
या कार्यक्रमा प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश वाघमोडे यांनी लंपी रोग आणि एफएमडी (लाळखुरकत) यांसारख्या विविध घातक रोगांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी लसीकरणाची योग्य वेळ, योग्य डोस, पद्धत आणि नियमिततेचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
“पशुपालन हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र, विविध रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. नियमित लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहून दूध उत्पादनात वाढ होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळते,” असे प्रतिपादन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले.
या उपक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे तसेच पशुसंवर्धन विभागातील प्रा. डी. एस. मेटकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश वाघमोडे व पिसेवाडीतील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“लसीकरण हाच लंपी रोगावरील सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असून, निरोगी पशुधन हेच समृद्ध शेतकऱ्यांचे खरे बळ आहे,” असा महत्त्वाचा संदेश या प्रसंगी देण्यात आला. पिसेवाडीतील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व भविष्यातही अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या यशस्वी जनजागृती व लसीकरण उपक्रमाचे आयोजन कृषीकन्या अंजली कदम तन्वी साबळे वैष्णवी कांबळे साक्षी भोसले निशा काळे पायल पवार नृत्या गेंड साक्षी पोळ यांनी केले.
Post Views: 10