पंढरपूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठीच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतींना मिळणारा निधी आता साडेतीन कोटींवरून साडेचार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते. , उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, गटनेत्या रश्मी बागल, मुख्यकार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते..
सभेत आषाढी वारीसाठी करण्यात येणाऱ्या विविध विकासकामे व सुविधांबाबतच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. पालखी मार्गावरील सांगोला, माढा, बार्शी, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील ग्रामपंचायतींना वाढीव निधी देण्याची मागणी सदस्यांनी केली होती. त्यास प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी ग्रामपंचायतींच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.
यापूर्वी ८१ ग्रामपंचायतींना ३ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. आता आणखी १० ग्रामपंचायतींचा पालखी मार्गातील गावांमध्ये समावेश करण्यात आल्याने ९१ ग्रामपंचायतींना या निधीचा लाभ मिळणार आहे.
वारी काळात वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वागत कमानी, पायांना आराम देणारी फुट मसाजर यंत्रणा, मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हॅंगर), शौचालये, स्नानगृहे, पालखी तळांना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषध खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन तसेच स्वच्छता व्यवस्थेसाठीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागामार्फत उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार तसेच सदस्यांनी आभार व्यक्त केले.
दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याच्या टँकरसंदर्भातील निविदा प्रक्रिया सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर व त्यांच्या पथकाचे विशेष अभिनंदन केले.
सभेत विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचा अभिनंदनाचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच आषाढी वारीसाठी तीन जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व प्रशासनाच्या कार्याचेही सदस्यांनी कौतुक केले.
Post Views: 27