सोलापूर – आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषध खरेदी प्रक्रियेतील विलंबाचा मुद्दा विशेष सभेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. वारीसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने सुमारे १० कोटी रुपयांच्या औषध खरेदी प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली; मात्र निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
पंढरपूर येथे आयोजित विशेष सभेत आषाढी वारीच्या अनुषंगाने विविध विभागांच्या निविदा मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्यात आले. बहुतेक विभागांच्या निविदांना सभागृहाची मंजुरी मिळाली. मात्र आरोग्य विभागाचा औषध खरेदीचा विषय पुन्हा चर्चेत आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील वारी व्यवस्थेसाठी औषध खरेदीची माहिती सभागृहासमोर मांडली.
यावेळी सदस्य व्यंकट भालके यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरील औषध खरेदीसाठी निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच औषध पुरवठा एका कंपनीपुरता मर्यादित न ठेवता विविध पुरवठादारांमार्फत खरेदी करून सर्व आरोग्य केंद्रांपर्यंत वेळेत औषधे पोहोचवावीत, अशी मागणी केली.
दरम्यान, माळशिरस तालुक्यातील काही आरोग्य केंद्रांमध्ये औषधांची कमतरता असल्याची बाब सदस्य बागल यांनी निदर्शनास आणली. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांचीही कमतरता असल्याने तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सभापती चेतन केदार यांनी वारी काळात औषधांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली असल्याचे स्पष्ट केले. तथापि, औषध खरेदी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी व प्रशासकीय विलंबामुळे हा विषय पुन्हा सभागृहात आल्याने आरोग्य विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, इतर विभागांनी आपापल्या विकासकामांच्या व सुविधा पुरवठ्याच्या निविदा मंजूर करून घेतल्या असताना आरोग्य विभागाच्या औषध खरेदी प्रक्रियेतील विलंबाची चर्चा सभागृहात अधिक रंगली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आता औषध खरेदीची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
फार्मासिस्टमुळे झाला गोंधळ
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने अनुभवी फार्मसीस्ट नियुक्ती करण्याची तयारी केली होती. पण फार्मासिस्ट पुजारी यांनी विभागीय आयुक्तांकडून नियुक्ती आणली. मुख्य औषध भंडाराचा कारभार मोठा असल्यामुळे व पुजारी यांना अनुभव नसल्यामुळे आषाढी वारीच्या औषध खरेदीचा गोंधळ उडाला आहे. त्यांनी निविदेवर सीईओ व डी एच ओ यांच्या सह्या न घेताच अपलोड केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे औषध खरेदी रखडली. या गोंधळामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. पण प्रशासनाने चालढकल करून त्यांच्या कारभाराला पाठीशी घातल्याचे दिसून आले आहे.
चौकट
आरोग्य सभापती चेतन केदार यांनी हा गोंधळ थांबविण्याबाबत यापूर्वी सूचना केल्या आहेत. अनुभवी फार्मशिष्ट नेमावा असे सांगूनही डीएचओनी तसा प्रस्ताव दिला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत औषध खरेदीवरून गोंधळ दिसून आला. इतर विभागांनी मात्र आपल्या कामाच्या सर्व निविदा सभागृहाकडून मंजूर करून घेतल्या
Post Views: 233