सोलापूर : विजयादशमीच्या मुहूर्तावर सोलापूर शहरातील सार्वजनिक नवरात्र मंडळांनी लेझीमच्या तालावर आणि ढोलांच्या गजरात शिस्तबद्ध, दिमाखदार मिरवणुका काढत नवरात्रोत्सवाचा समारोप केला. मध्यवर्ती नवरात्रोत्सव महामंडळांतर्गत २५ हून अधिक मंडळांच्या मिरवणुका निघाल्या तर ८० हून अधिक मंडळांनी परिसरातून मिरवणुका काढल्या. ३१६ हून अधिक मंडळांनी जागेवरच महाआरती केली. नंदीवर आरूढ महादेव, परशुधारी शिवांचा रुद्रावतार आणि अघोरींचा दरबार अशा धार्मिक देखाव्यांनी मिरवणुकांचे आकर्षण वाढविले.
मंगळवारी दुपारी चार वाजल्यापासून सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. लेझीम पथकांचा ताल, ढोलपथकांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि फुलांची आकर्षक सजावट यामुळे मिरवणुकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विविध धार्मिक देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
जयभवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या १२० जणांच्या ढोलपथकात नीलकंठ भगवान महादेवांची वेशभूषा केलेले कलाकार नंदीवर आरूढ झाले होते. प्रताप तालीम मंडळाने गळ्यात कंकाळमाला आणि हातात भव्य परशू घेतलेल्या शिवांचा रुद्रावतार साकारला होता. त्यासोबत अघोरींचा दरबारही लक्षवेधी ठरला. बुरूड शक्ती मंडळाने कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिकृती साकारली, तर जागृती माता मंडळाने भगवान अय्यप्पा स्वामी आणि कार्तिक स्वामींच्या प्रतिमांसह फुलांची मनमोहक आरास केली होती. दाळगे प्लॉट मंडळाने दोन देवींच्या मूर्तींसह छत्रपती शिवराय आशीर्वाद घेतानाची मूर्ती साकारली होती. आकाश गंगा, उदयमुखी माता आणि शिवगौरी माता मंडळांच्या लेझीम पथकांनी तालबद्ध सादरीकरण करत मिरवणुकांची रंगत वाढवली.
विविध देवींच्या पालख्या शमीपूजनासाठी
ग्रामदेवता रूपाभवानी मंदिरासह शिवगंगा मंदिर, श्री अंबाबाई मंदिर, हिंगुलांबिका देवी मंदिर आणि इंद्रभवानी देवी मंदिराच्या पालख्या शमीपूजनासाठी सहभागी झाल्या. अन्य मंडळांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. बलिदान चौकातून मध्यवर्ती नवरात्रोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. पार्क चौकातील शमी वृक्षाजवळ सीमोल्लंघन आणि शमीपूजनाचा धार्मिक सोहळा पार पडला.
मिरवणुका अन् महाआरतीने सांगता
मध्यवर्ती मंडळांतर्गत २५ हून अधिक मंडळांनी मिरवणुका काढल्या, तर ८० हून अधिक मंडळांनी आपापल्या परिसरात मिरवणुका काढून उत्सव साजरा केला. ३१६ हून अधिक मंडळांनी जागेवरच महाआरती करून नवरात्रोत्सवाची सांगता केली. पारंपरिक वाद्यांचा निनाद, लेझीम पथकांचे सादरीकरण आणि धार्मिक देखाव्यांनी विजयादशमीच्या उत्सवात रंग भरला. शिस्तबद्ध मिरवणुका आणि भक्तिमय वातावरणामुळे सोलापुरातील नवरात्रोत्सवाचा समारोप दिमाखात झाला.
Post Views: 7