बार्शी – भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलीस स्टेशन व जिजाऊ गुरुकुल सैनिक स्कूल, खांडवी यांच्या संयुक्त विद्यमाने खांडवी येथे भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. रॅलीमध्ये पोलीस अधिकारी-कर्मचारी, शाळेचे एनसीसी पथक, बँड पथक तसेच विद्यार्थी अशा सुमारे २५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे व जिजाऊ गुरुकुल सैनिक स्कूलचे संस्थापक संभाजी घाडगे यांच्या पुढाकारातून रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात भारतमातेविषयी अभिमान अशा उत्साहपूर्ण वातावरणात गावातून रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान विद्यार्थी व पोलिसांनी विविध देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता तसेच तिरंग्याविषयी आदराची भावना जागृत केली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणे, राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि राष्ट्राच्या एकतेचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
रॅलीला गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत तिरंग्याला अभिवादन केले. त्यामुळे संपूर्ण खांडवी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
रॅलीच्या सांगतेनंतर बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्यावतीने सहभागी विद्यार्थ्यांना केळी व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करुन त्यांच्या देशभक्तीपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन दिले.