सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेची संघटनात्मक जबाबदारी संदीप मेंडगुदले यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांची दक्षिण सोलापूर युवा सेनेच्या तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षसंघटनेत सातत्याने केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संदीप मेंडगुदले यांनी मंद्रूप गावातील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची मंद्रूप शहरप्रमुख, शिवसेना तालुका उपविभागप्रमुख, मंद्रूप विभागप्रमुख आणि तालुका उपप्रमुख अशा विविध पदांवर निवड झाली. या काळात त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात गावोगावी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले.
शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच, जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलने आणि पाठपुरावा करण्याचे काम मेंडगुदले यांनी केले. सत्तेच्या राजकारणात अनेक नेते पक्षांतर करीत असताना आपण पक्षाशी निष्ठावान राहून संघटन वाढविण्याचे काम सुरू ठेवले, अशी त्यांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
निवडीनंतर बोलताना संदीप मेंडगुदले म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचार तसेच पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. गोरगरीब, वंचित घटक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणार असून, दक्षिण सोलापूर तालुक्यात गावागावांत तसेच वाड्या-वस्त्यांवर युवा सेनेच्या शाखा उभारून संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post Views: 14