सोलापूर – २१ जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या प्रचारासाठी योग दिवस समन्वय समितीच्या वतीने रविवारी (दि. १४) शहरात भव्य योगदिंडी काढण्यात आली होती.
या दिंडीचे आयोजन नागेश कन्ना व बसवराज उंबरजे यांनी केले होते. रविवार सकाळी साडेसहा वाजता विणकर बागेतून या दिंडीला सुरुवात झाली. त्यानंतर साखरपेठ, समाचार चौक, कोंतम चौक, जोडभावी पेठ, भुलाभाई देसाई चौक मार्गे मार्गक्रमण करत ही दिंडी पुन्हा विणकर बाग येथे आली. तिथेच दिंडीचा समारोप करण्यात आला.
या योगदिंडीमध्ये सोलापूर शहरातील विविध योग संस्थांचे प्रतिनिधी व साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये भारतीय योग संस्थेचे चिवड शेट्टी, पतंजली योगपीठाचे रघुनाथ क्षीरसागर, विवेकानंद केंद्राचे रवी कंटकी, योग सेवा मंडळाचे संतोष सासवडे, योग साधना मंडळाचे नागनाथ पाटील, सर्वोदय योग साधना मंडळाचे अशोक गरड, विणकर बागेचे मोहन भूमकर यांच्यासह गीता परिवार, सर्व कल्याण योग आणि पिरामिड ध्यान परिवाराचे पदाधिकारी व साधक उपस्थित होते.
दिंडीच्या मार्गावर सोमवार पेठ येथे श्री. रंगनाथजी येरमवार यांच्या वतीने, तर जोडभावी पेठ येथे श्री. लक्ष्मीकांतजी सोमानी व जोडभावी पेठ युवक मंडळाच्या वतीने सहभागी साधकांसाठी जलपानाची सोय करण्यात आली होती, अशी माहिती समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा यांनी दिली.



















