
सोलापूर – सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने सुरू असलेल्या लिटील चॅम्प चषक’ क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात सलीम खान संघ आणि दास्ताने संघाने आपापल्या सामन्यात शानदार विजय घोडदौड कायम ठेवली आहे.
जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात कुद्दूस खान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ३० षटकांत ८ बाद १२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सलीम खान संघाने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत २४.५ षटकांत ६ बाद १३० धावा पूर्ण केल्या आणि ४ गडी राखून विजय मिळवला. सलीम खान संघाच्या विजयात निमेश मणियार याने ३ षटकांत अवघ्या १३ धावा देत २ बळी घेतले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात दास्ताने संघाने श्रीनिवास शिवाळ संघावर २४ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना दास्ताने संघाचा डाव २६.३ षटकांत सर्वबाद १२२ धावांवर आटोपला होता. मात्र, दास्तानेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीनिवास शिवाळ संघाला २४.३ षटकांत अवघ्या ९८ धावांवर रोखले आणि सर्वबाद केले. दास्ताने संघाच्या या विजयात वेंकटेश घाडगे याने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने फलंदाजीत ३१ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या, तर गोलंदाजीत १ षटकात ३ धावा देऊन १ बळी घेतला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
आजच्या दोन्ही सामन्यांचे पंच म्हणून प्रवीण कुलकर्णी आणि चंदू मंजली यांनी काम पाहिले, तर गुणलेखक म्हणून शुभम मुत्तूर यांनी जबाबदारी सांभाळली.





















